मावळचं पठार - किल्ले कोरीगड

नुकताच पाऊस सुरू होतोय अन अशा वेळी गडाचे प्रशस्त पठार, तिथून चहूकडे दिसणारे सह्यकड़े अन पायथ्याशी Amby Valley चे दिसणारेे रईस दृष्य साद देणारंच. म्हणूनच शनिवारी ऑफिसमधील काही मित्रांसोबत कोरीगडला जायचा बेत आखला.


मी, गडाच्या पायथ्याशी

किल्ल्याविषयी -
काही तपशिलानुसार, गडाच्या आसपासच्या मावळ भागास कोरबारसं म्हणत. गडाच्या आसपास पवनेच्या खोऱ्यात कोरी जमातीचे कोळी राहत, म्हणून गडाला कोरीगड असं नाव.

स्वराज्यस्थापनेनंतर शिवरायांनी १६५७ साली लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना ह्या किल्ल्यांसोबत कोरीगड़ प्रथम स्वराज्यात आणला. पुढे १८१८ मधे कर्नल प्रोथरने ११ ते १३ मार्च असे ३ दिवस या गडावर हल्ला केला काही यश येत नाही असे दिसल्यावर शेवटी १४ मार्च रोजी गडावरील दारुकोठारावरच तोफगोळा डागला. प्रचंड नुकसान झाल्याने गडाच्या शिबंदीस शरणागती पत्करावी लागली. गडावरील कोराईदेवीचे सर्व दागिने नंतर मुंबईच्या मुंबा देवीला चढविण्यात आले.


पायथ्याहून दिसणारा कातळकडा 

पायथ्याहून दिसणारा गडमाथा 

सकाळी ७.३० पर्यंत वाकडजवळ आम्ही सगळे एकत्र जमलो आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गाने लोणावळ्याला पोहोचलो. निसर्गाने कृपा केल्याने भरून आलेले ढग अन सोबत हलक्या पावसाच्या सरी यांच्या सहवासात प्रवास मस्त झाला. लोणावळ्यात कुमार रेसॉर्ट मधे नाश्ता करून आय.एन.एस शिवाजीच्या दिशेने पेठ शहापूरकड़े आम्ही मार्गस्थ झालो.


महामार्गावरून दूरवर दिसणाऱ्या पवनचक्क्या 


कुमार रेसॉर्ट. महाग पण चांगले. 


लोणावळ्याहून भुशी धरणाकडे जाताना वाटेत लागणारी धरणाची भिंत. 

कधी ढगातून तर कधी गर्द हिरवाईतून होणारा प्रवास. लोणावळा ते पेठ शहापूर. 
लोणावळ्यापासून अगदी पायथ्यापर्यंत रस्ता अतिशय उत्तम आहे. वाटेत प्रथम भुशी धरण, पुढे आय.एन.एस 
शिवाजी आणि नंतर लायन्स पॉइंट असे करत गर्द धुक्यात दडलेल्या रस्त्यातून मार्ग काढत आणि अर्थातच त्या सौंदर्याची छबी टिपत साधारण अर्ध्या तासात आम्ही पेठ शहापूरमधे पोहोचलो.






पेठ शहापूर


पेठ शहापूर हा गडाचा पायथा. गडाच्या दुसऱ्या दिशेस अम्बवणे नावाचे गाव आहे तिथूनही गडावर जाता येते.
मात्र ती वाट ज़रा कठीण आहे. पेठ शहापूर मार्गे जाणारी वाट अत्यंत सोपी आहे. १०-१५ मिनिटे पायवाट तुडवली की पुढे पायऱ्या सुरू होतात. तिथून अजून १५-२० मिनिटात गड माथ्यावर पोहोचता येते.
वाटेत एक गणपती मंदीर आहे, त्याच्याजवळच दुघई गुहा आहे. पुढे वाटेत अजून दोन गुहा आहेत. त्यापुढे गडमाथ्यावर जाणारा गणेश दरवाजा आहे


गणेश मंदिर व दुघई गुहा


गणेश मंदिरासमोरील मोकळी जागा. खास Amby Valley चा नजारा पाहण्यासाठी. 


गणेश मंदीराहून दिसणारा गड माथ्यावरील बुरूज. 


वाटेत अशा २ गुहा आहेत. 


गडमाथा म्हणजे एक विशाल पठारच आहे. गडाभोवती तटबंदी आहे मात्र दक्षिणेकडील चिलखती तटबंदी लक्षणीय आहे. पूर्वी तिथूनच खाली अम्बवणे गावात उतरायला चोर दरवाजा होता. तटबंदी बऱ्यापैकी रुंद आहे. गणेश दरवाज्यानजीकच २ तोफा आहेत. गडावर एकूण ६ तोफा आहेत. त्यातली सगळ्यात मोठी लक्ष्मी तोफ कोराईदेवीच्या मंदिराजवळ आहे. कोराईदेवीच्या मंदिरासोबतच गडावर शंकराचे आणि विष्णूचे मंदिर आहे. जवळच २ तळी आहेत. गडाच्या पश्चिमेस गणेश टाके आहे.


प्रवेशद्वार - गणेश दरवाजा 


तत्कालीन वास्तूचे भग्नावशेष 

भग्न सदर 


गडमाथ्यावर पोहोचताच दिसणारे विशाल पठार


जीर्णोद्धारीत शंकर मंदिर


गडावर अशी २ तळी आहेत


गडाच्या दक्षिणेकडील चिलखती तटबंदी. इथून आंबवणे गावात उतरणारा छुपा मार्ग आहे. 


गणेश टाके. 

आता गडाच्या डागडुजीचे थोडेफार काम सहारा परिवार करतो. मंदिरांचा जीर्णोद्धार केलेला आहे. सहारा परिवारातर्फे एक कार्यकर्ता आठवड्यातून ३-४ दिवस गडावर देखरेखीसाठी असतो. कोराईदेवीच्या मंदिरात आत १०-१५ लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते



कोराईदेवी मंदिर.  


कोराईदेवी मंदिरानजीक असलेली, गडावरील सर्वात मोठी लक्षी तोफ  


मंदिर गाभारा. येथे १२-१५ लोकांची राहायची सोय होऊ शकते. 
गडावर पाहण्यासारख्या फार काही जागा नाहीत. ढग नसतील तर गडावरून तुंग, तिकोना, राजमाची, प्रबळगड, माथेरान, कर्नाळा इ. ठिकाणे दिसतात. साधारण तासभरात गड फिरून होतो आणि २० मिनिटात खाली पायथ्याशी पोहोचतो.


गडमाथ्यावरून दिसणारा Amby Valleyचा नजारा. दूरवर ढगात दडलेले किल्ले तुंग व किल्ले तिकोना. 


भरून आलेले आभाळ आणि विस्तीर्ण पठार. 

लक्षात राहते ते विस्तीर्ण पठार. एखाद्या आमवास्येच्या रात्री मस्त tent ठोकून खास अवकाशदर्शनाचा आनंद घ्यायच्या विचारात आम्ही कोरीगडाचा निरोप घेतला.


आमचा काफिला


************************************************


कसे जावे -
पुण्याहून कोरीगडला २ मार्ग आहेत.
१. चांदणी चौक - पौड - अंबवणे ह्या मार्गाने जाताना Amby Valley मधून जावे लागते. त्याकरता Amby Valley व्यवस्थापनाची संमती मिळावी लागते. आणि तो मार्ग पण अवघड आहे.
२. पुणे - लोणावळा - भुशी धरण - आय.एन.एस शिवाजी - पेठ शहापूर.

************************************************


जवळपासची ठिकाणे -
१. लायन्स पॉइंट
२. भुशी धरण
३. Wax Museum


************************************************


एकूण खर्च -
जुन्या महामार्गाने गेल्यास - टोल ₹.९२
नाश्ता/जेवण - ऑर्डरप्रमाणे
गडाच्या पायथ्याशी खाण्याची फारशी सोय नाही.
गडावर पाणी उपलब्ध नाही.
मात्र लोणावळ्यात सर्व सोयी उपलब्ध.

पार्किंग गड पायथा - बाईक ₹.३० कार -₹.५०
/*********************************************************************/
May your search through nature lead you to yourself.
Enjoy Travelling!!

Thank you

Comments

  1. Photos and information is good. Must have enjoyed due to nice climate and very big group.

    ReplyDelete

Post a Comment