स्वागत

"अगला स्टेशन आर.के.आश्रम मार्ग, दरवाजे बायी तरफ खुलेंगे कृपया सावधानी से उतरे." मेट्रोतील ध्वनीमुद्रिकेने आमचे स्थानक आल्याची जाणीव करून दिली आणि दिल्लीहून सिमल्याला जाणाऱ्या बसच्या शोधार्थ आम्ही बाहेर पडलो. करोलबागेपासून 2 मेट्रो स्टेशन सोडून हे आर.के.आश्रममार्ग मेट्रो स्टेशन येते. स्टेशनच्या बाहेर दिल्लीहून हिमाचल, चंदिगड, राजस्थान आदी ठिकाणी जाणाऱ्या खाजगी बसेस सुटतात. HRTC च्या एका व्होल्वो मध्ये आमचे बुकिंग मी केलेले होते. ह्या खाजगी कंपन्यांचे कारभार बाकी दिव्य असतात. आपल्या इच्छित स्थळीच बस जाणार असल्याची वारंवार खात्री करून घ्यावी लागते. न जाणो सिमल्याची म्हणून रात्री आपण बसायचे आणि सकाळ जयपूरला व्हायची. दिल्लीचा निरोप घेत आमची बस निघाली. रात्र प्रवासाची होती. नव्या दिल्लीतून पुढे जात पुरानी दिल्लीच्या काश्मीरी गेटपाशी अजून इतर प्रवाशांना घेऊन साधारण तासाभरात बस दिल्ली - कालका महामार्गाला लागली.

दिल्लीहून सिमला साधारण 350 किलोमीटर्सचा रस्ता. कालका हे सिमल्याच्या पायथ्याचे शहर. तिथवर सरळसोट रस्ता; ना टेकड्या ना घाट. कालक्यापासून सुरू होणारा प्रवास विशेष अवघड. हिमालयाच्या कुशीत घेऊन जाणारी ती नागमोडी वळणे, ते सुनसान रस्ते आणि हिमाचालचे रौद्र रूप दाखवणारी शेकडो फूट खोल दरी. पण हे ड्रायव्हर लोक त्यात मुरलेले असतात, सुसाट गाडी चालवत आपल्याला नेतात, वाटेत प्रवाशांचे काय व्हायचेत ते हाल होऊदेत ह्यांना त्याचं सोयरं सुतक नसतं. मध्यरात्री पानिपत आले. हायवेवरच गाडी जेवायला थांबली. पनीर अन तंदूर रोटीवर ताव मारून आमचा पुढचा प्रवास सुरु झाला. पोट मस्त भरल्यामुळे जरा वेळातच आम्हा दोघांचा डोळा लागला.

पहाटे तीन साडेतीनच्या आसपास जाग आली तेव्हा गाडी कालक्यात पोहचलेली होती. आता नागमोडी वळणांचा पुढचा प्रवास कसा होतोय ते अनुभवायला मी पण आळस झटकून बसलो. शेजारी केतकी गाढ झोपलेली होती. कालक्याहून पुढे जाणारा रस्ता माझ्या अपेक्षेपेक्षा फारच चांगला निघाला. चांगला 3 बसेस एकत्र जातील इतका रुंद रस्ता आणि वाटेत अधून मधून दिसणारी घरं, रिसॉर्ट्स, हॉटेल्स. रस्त्याची अवस्था पण उत्तम. जसजसे वर चढत होतो तसतसे वाटेतील वस्ती थोडी कमी झाली. त्यामुळे खिडकीबाहेर तसा काळोखाच होता, दरीच होती बाहेर. 'अंधारात दरीच्या खोलीची जाणीव न आल्यामुळे प्रवासात मनात बरेवाईट विचार येत नाहीत हे किती बरं असतं. हाच प्रवास जर दिवसाढवळ्या झाला असता तर एसी मध्ये पण घाम फुटला असता मला. अज्ञानात सुख असतं ते हे.' असा विचार करता करता सहज नजर आकाशाकडे गेली आणि क्षणभर वास्तवाची जाणीवच विसरली गेली. एकदम डोक्यात आले, अरे आज तर बलिप्रतिपदा! प्रतिपदेच्या त्या आकाशत लक्ष लक्ष तारकांची मांदियाळी जमली होती. काळोखात अवकाश अनुभवायचा योग, शहरात दुर्मिळच! स्तिमित होऊन मी ते स्वर्गीय सौंदर्य न्याहाळत होतो. एकतर व्होल्वोच्या खिडक्या मोठ्या असतात, त्यामुळे माझ्या एका नजरेत ते संपूर्ण दृश्य सामावत देखील नव्हतं. इथेच काळ थांबावा आणि मनसोक्त या सौंदर्याचा आस्वाद मला घेता यावा असं वाटलं. मी अक्षरशः हापापल्यासारखा वेगवेगळ्या बाजूस डोके फिरवून जमेल तितके ते दृश्य बघत होतो. एखादा ताऱ्यांचा पुंजका पहायच्या नादात एक दोनदा त्या बंद काचेवर डोके आपटवूनपण घेतले. या सगळ्यात किती वेळ गेला ते कळलंच नाही. खरंच, अस्सल सौंदर्य काळाची जाणीव विसरायला लावतं.

एका वळणावर छोट्या खिंडीतून आमची बस पुढे आली आणि जरा वेळापूर्वी घेतलेला हा अनुभव थिटा पडावा असा नजारा समोर आलाडोईवर असंख्य ताऱ्यांनी उजळलेले प्रतिपदेचे आकाश होतेच आणि त्याचे जणू प्रतिबिंबच वाटावे असे लक्ष दिव्यांनी उजळलेले दरीतील सिमला हळू हळू नजरे समोर येऊ लागले होते. माझा आनंद 'द्विगुणित' झाला होता. Christ church ते मनोरे आणि समोरच्या जाखू डोंगरमाथ्यावरचा तो मारुती दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघाले होते.


साडेपाच वाजून गेले होते, पहाट आळोखे पिळोखे देत उठत होती. व्हिक्टरी टनेलपाशी गाडी थांबली. लाष्ट ष्टोप लाष्ट ष्टोप म्हणत क्लिनरनं सगळ्या प्रवाशांना उठवलं. खाली उतरतोय तोच सगळ्या कुली मंडळींनी आम्हाला वेढलं. थोडी हुज्जत घालून आम्ही एका त्यातल्या त्यात 'कुलीन' माणसासोबत आमच्या विश्रामगृहाच्या दिशेने जाऊ लागलो. रस्ता चढाईचा होता. सिमल्यात सरळ रस्ता फक्त रिज वर सापडतो. बाकी सगळे चढण-उतरणच. पूर्वक्षितिजपाशी झालेली लाल तांबड्या रंगांची उधळण दिवस उजडल्याची जाणीव करून देत होती. उदयाचळी आलेला 'मित्र' हिमालयाच्या साक्षीने आमचे सिमलानगरीत स्वागत करत होता.


Comments