केशवराज, एक रम्य अनुभव.

केशवराज!
हे नाव साधारण आठएक वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा ऐकलं होतं. कॉलेजमध्ये फिरोदियाकरिता जे नाटक आम्ही करत होतो त्याची पार्श्वभूमी कोकणची होती आणि त्यात ह्या केशवराजचा उल्लेख होता. त्यानंतर अनेकदा कोकणात येणं झालं पण हे केशवराज प्रकरण काय आहे हे काही पहायचा योग आला नाही. या वेळच्या कोकण भेटीत तो आला आणि पहिल्या भेटीतच अविस्मरणीय असा अनुभव ह्या केशवराज ने दिला.

तसा मी निस्सीम कोकणभक्त. दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा कोकण भ्रमंती करायला आलो होतो त्या नंतर दर वर्षी दोन वेळा तरी कोकण भटकंती करायला जातोच. दर वेळेस कुठलेतरी नवीन, वेगळे ठिकाण फिरतो. या खेपेस गुहागर आणि त्याच्या आसपास भटकंती करायला आम्ही बारा तेरा जण गेलो होतो.

गुहागरहून पुण्याला परत येताना, दापोली मार्गे येऊन पुढे NH17 ला लागून, पोलादपूर मार्गे महाबळेश्वर आणि तिथून NH4 ने पुण्याला यायचे ठरले. दापोलीत जातच आहोत तर वेळ मिळाल्यास केशवराज भेट पण ठरली. दुपारी दोन अडीचच्या आसपास आम्ही दापोलीत पोहोचलो. श्रेयसमध्ये मस्त जेवण उरकून मोर्चा असुद गावाकडे वळवला.

दापोली ते असुद हा साधारण आठ किलोमीटर्सचा मार्ग. दापोली हर्णे रस्त्यावर पाच किलोमीटर्सनंतर असुदकडे जायला एक फाटा फुटतो तिथून साधारण 3 किलोमीटर्स वर केशवराजला जाण्याकरिता पायवाट आहे. रस्त्यावरच गाडी लावावी लागते.

इथून सुरु होतो एक रम्य प्रवास.
केशवराज प्रतिष्ठानचा फलक आपले स्वागत करतो. हा सर्व परिसर ह्या प्रतिष्ठानामार्फतच सांभाळला जातोय. डोंगरउताराकडे गर्द झाडीत एक पायवाट जाते. समोरच पाण्याचा एक ओहोळ आहे. हे पाणी डोंगरमाथ्यावर साठलेले, जमिनीत मुरलेले आणि मग त्या ओहोळातून पुढे असूद बागेत येते. कोकणात वाडी म्हटलं की सहसा आपल्याला किनाऱ्यावरची नारळी - पोफळीची एकरात पसरलेली वाडी डोळ्यासमोर येते. केशवराजला जाताना डोंगरउतारावरची दोन्ही बाजूंना पसरलेली ही गर्द वाडी मी पहिल्यांदाच पाहिली. 
नारळी - पोफळी, आंबा, काजू आदी झाडांनी सजलेली, आसपास कोकणमेव्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी ही छोटी टेकडी आणि केशवराजपर्यंतचा आमचा प्रवास खूप सुखद अनुभव देणारा ठरला. 
साधारण तासाभराच्या प्रवासात जमेल तितका केशवराज मनात आणि कॅमेऱ्यात टिपून घेतला. पुण्याला निघायची वेळ जवळ आली होती. पुढल्या खेपेस आख्खा दिवस केशवराज आणि जवळच्याच व्याघ्रेश्वराच्या सहवासात घालवण्याचे ठरवून आम्ही असुद बागेचा निरोप घेतला. 
















पुण्यात येईपर्यंत हिरव्यागार वनराईच्या कुशीतला केशवराज नजरेसमोरून काही जात नव्हता. 

कसे जावे 
पुणे ते दापोली (१८५ किमी)
१. ताम्हिणी मार्गे पुणे - माणगाव - खेड - दापोली
२. वरंध मार्गे पुणे - भोर - महाड - खेदड - दापोली
३. पसरणी मार्गे पुणे - वाई - पाचगणी - महाबळेश्वर - पोलादपूर - खेड - दापोली 
दापोली ते असूद बाग (८ किमी)
१. दापोली - हर्णे मार्गावर ५ किमी वर उजवीकडे असुदसाठी वळावे. 
२. दापोली - गिम्हवणे - असुद बाग असा ३ किमीचा मार्ग केशवराजपाशी पोहोचतो. 
दापोलीहून असुद बागेपर्यंत बस सेवाही उपलब्ध आहे. तसेच रिक्षा, जीपनेदेखील असूद बागेपर्यंत जाता येते 

राहण्याची/जेवणाची सोय 
दापोली मध्ये राहण्या-खाण्याची उत्तम सोय होऊ शकते. 
असूद बागेत साधारण तासभर आधी ऑर्डर देऊन जेवायची सोयही केली जाऊ शकते. 
दापोलीत पोहोचाल्यावर श्रेयस नामक खानावळीत उत्तम दर्जाचे शाकाहारी भोजन मिळते. 

शाकाहारी थाळी, हॉटेल श्रेयस - दापोली
संपर्क 
१. असुद बाग - ९०२८४१४८४८ / ०२३५७ २३४८९५
२.  हॉटेल श्रेयस, दापोली - ९४२११८६७२१

/**************/
May your search through nature lead you to yourself.
Cheers Himanshu!!
/******************/

Comments

  1. Apratim..appreciate for taking time out for such a nice write up.. I am sure your this blog will definitely encourage many to visit this awesome place..

    ReplyDelete
  2. Apratim..appreciate for taking time out for such a nice write up.. I am sure your this blog will definitely encourage many to visit this awesome place..

    ReplyDelete
  3. Wa wa. Nakki jayla hav. Mi pan far premat aahe kokan chya pan far firan nahi zal. By railway jata yen shakya aahe ka re?

    ReplyDelete
  4. Aarti,
    Yes you can reach their by Railway too. Khed is the nearest railway station.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Post a Comment