गगनभेदी सुळका - किल्ले तुंग


अचानक पहाटे जाग यावी… खिडकीबाहेर बघता नुकतेच उजाडायला सुरुवात झालेली असावी… ढग भरून आलेले असावेत… हळू हळू हलक्या पावसाच्या सरींचा आवाज यावा... वाऱ्याची मंद झुळूक यावी अन अंगावर शहारा यावा…सूर्य उगवून दिवसभर ढगाआडच रहावा… अशा रम्य वातावरणात घराबाहेर पडावे आणि आख्खा दिवस निसर्गाच्या सहवासात घालवावा.
अगदी असाच अनुभव आम्हाला आमच्या तुंगच्या ट्रेक मध्ये आला. 

गेल्या आठवडयात ऑफिसच्या मित्रमंडळींसोबत तिकोना केला होता. ह्या वेळी त्याचा घाट-बंधू असणारा तुंग करायचे ठरवले. 

Selfie Time  
किल्ल्याविषयी

तुंग आणि तिकोना हे मावळ - पवना प्रांताचे चौकीदार, घाटरक्षक. बोरघाट पवना मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे दुर्ग. किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती फारशी उपलब्ध नाही. काही तपशिलानुसार 
१६५७ साली शिवरायांनी हा किल्ला मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसह स्वराज्यात आणला. 
१६६० साली नेताजी पालकर यांच्याकडे या प्रांताच्या सुरक्षिततेची जबाबदारी देण्यात आली. 
६ मे १६६५ रोजी जयसिंग आणि दिलेरखान यांनी स्वराज्यावर स्वारी करून तुंग - तिकोनाच्या आसपासची अनेक गावे जाळली मात्र किल्ले काबीज करू शकले नाहीत. 
पुढे १२ जून १६६५ च्या पुरंदर तहानुसार १८ जून रोजी कुबाद्खन हलालखान आणि इतर सरदारांनी किल्ल्यासोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. 

तिकोनापेठेतून तुंगवाडीकडे जाताना दिसणारा गडाचा सुळका
मी आणि माझी i10. ३ वर्षांचा सहवास 
वाटेत दिसलेला बहरलेला गुलमोहर
आम्ही सकाळी ६.१५ पर्यंत पुण्याहून चांदणी चौकमार्गे पौडच्या दिशेने निघालो. आमच्यासोबत आधी बाईकने येणारे पण नंतर आमच्याच कारमधून येणाऱ्या मित्रांना घेऊन पिरंगुटपर्यंत येण्यास थोडा विलंब झाला. वाटेत पिरंगुट येथील मंगलमुर्ती खाणावळमध्ये वडापाव चहा असा नाश्ता केला. आणि पावणेआठच्या आसपास पुढे प्रस्थान केले. 

आमच्या सोबतचे महिला मंडळ - (L to R - मानसी, केतकी, रेणुका, अमृता )
पौड बसस्थानकाजवळ उजवीकडचा रस्ता पकडून आम्ही हाडशीच्या दिशेने निघालो. साधारण अर्ध्या पाऊण तासात जवण गावापाशी पोहोचलो. तिथून २ रस्ते फुटतात. एक उजवीकडे तीकोनापेठेत जातो तर दुसरा तुंगच्या पायथ्याला असणाऱ्या तुंगवाडीकडे. वाटेत ऊन पावसाचा सुंदर खेळ अनुभवत, फोटो काढत आम्ही जवण - चावसर - मोर्वे मार्गे साधारण अर्ध्या तासात आम्ही तुंगवाडीत पोहोचलो. तुंगवाडीच्या अलीकडे मुख्य रस्त्यापासून डावीकडे एक फाटा फुटतो तो गडाच्या पायथ्याशी जातो.

तुंगवाडीच्या अलिकडे. डावीकडे रस्ता गडाच्या पायथ्याशी जातो. सरळ रस्ता क्लब महिंद्रा रेसॉर्टकडे जातो.   
तुंगवाडीकडे जाताना वाटेत दिसणारा तुंग.  
पुणे ते तुंगवाडी हे साधारण ६०किमी अंतर. हाडशी पर्यंत रस्ता उत्तम आहे. नंतर मात्र रस्ता मधे मधे खराब रस्ता लागतो. काही ठिकाणी तर अत्यंत वाईट भागातून गाडी न्यावी लागते तेव्हा स्वतःचीच गाडी असेल तर मनावर दगड ठेवून driving करावे लागते. 

९.३० वाजेपर्यंत आम्ही तुंगच्या पायथ्याशी पोहोचालो. किल्ल्याच्या पायथ्याशी मारुतीचे एक मंदिर आहे. overnight ट्रेक करणाऱ्यांसाठी इथे ६-७ लोकांची राहायची सोय होऊ शकते. मंदिराजवळच आता जरा साफसफाई करून गाड्या पार्क करण्यासाठी मोकळी जागा केलेली आहे. वाटेत सुरुवातीलाच गडाबद्दल माहिती देणारा आणि सूचना देणारा एक बोर्ड आहे.

गडाच्या पायथ्याशी पार्किंगकरता मोकळी जागा आहे.  
पायथ्यालाच मारुतीचे मंदीर आहे. 
मारुती मंदिरात ६-७ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. 
गडाबद्दल काही माहिती व सूचना देणारा फलक
आमच्या आधी गडावर चढणारा एक गृप 
वाटेतील प्राचीन मूर्ती 
सुरुवातीचे चढण सोपे आहे. वाटेत खडकात कातरलेल्या काही पायऱ्या आहेत. पावसाळ्यात तिथून थोडे सावकाश जावे. वाटेत एके ठिकाणी खडकात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे. पुढे वाटेत एक छोटी गुहा लागते. वाटेत एक गोमुखी रचनेचा पडका दरवाजा आहे. तिथून आत गेल्यावर आपण गडमाथ्यावर पोहोचतो. वरती गणपतीचे एक मंदिर आहे. मंदिरालगतच पाण्याचा खंदक आहे.

खडकात कातरलेल्या पायऱ्या 
वाटेत एका चढणावर दिसलेला ढगात लपलेला किल्ले तिकोना
वाटेत गुहेत ध्यानस्थ बसलेले गिरीशकाका 
जसजसे आपण वर चढतो तसतसे आजूबाजूची डोंगररांग मोहक दिसू लागते 
गडावर केळीची अनेक झाडे आहेत. अशाच एका ठिकाणी विसावणारी मानसी 
वरून दिसणारे मारुतीचे मंदिर 
गडाच्या मागे तुंग सारखाच आकार असणारा डोंगर. याला फसवा तुंग असेही म्हणतात
जुनी तटबंदी 
गोमुखी रचनेचा पडका दरवाजा
दरवाज्यातून बाहेर दिसणारे दृष्य
दरवाज्यापासून वर बुरुजाकडे जाणाऱ्या पायऱ्या 
भग्न तट 
बुरुजाचा आतील भाग बऱ्यापैकी भक्कम आहे 
बुरुजाहून गडमाथ्याकडे जाणारा दरवाजा. याच्या दोन्ही बाजूंना आत खोलीवजा जागा आहे. 
भिंतीवर केलेले प्राचीन कोरीवकाम 
माथ्यावरून दिसणारा बालेकिल्ला 
गणपती मंदीर 
मंदिराजवळील खंदक
वाटेत दिसलेली सापसुळी
माथ्याहून दिसणारे ढगात दडलेले किल्ले लोहगड (डावीकडे) आणि किल्ले विसापूर (उजवीकडे)
सध्या पाणी नसल्याने पवनेच्या पत्रातील काही बेटे वर आली आहेत. 
माथ्यावर मंदिरानजिकच असणारी सदरची जागा 

सदर जवळूनच एक वाट बालेकिल्यावर जाते. बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवरून काळजीपूर्वक जावे. वाट अरुंद आणि खडकाळ आहे. बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिराच्या आत राहण्याची सोय होऊ शकते. बालेकिल्ल्याचा आकार खूप लहान आहे. एका वेळेस २५-३० लोकं उभी राहू शकतात इतपतच. रमत गमत ११ वाजेपर्यंत बालेकिल्ल्यावर पोहोचलो. सोबत आणलेला नाश्ता करून साधारण तासभर आम्ही वर आराम केला आणि अर्ध्या तासात गड उतरून पायथा गाठला.

बालेकिल्ल्याला जाणारी वाट 
बालेकिल्ला 
बालेकिल्ल्याची वाट अरुंद असल्याने प्रथम उतरणाऱ्यांना उतरू द्यावे मगच आपण चढावे. 
बालेकिल्ल्याचा माथा 
बालेकिल्ल्यावरून दिसणारी सभोवतालची डोंगररांग 
बालेकिल्ल्यावरील तुंगीदेवीचे मंदिर 
तुंगीदेवीच्या मंदिरामागे पवनेच्या पल्याड दिसणारा किल्ले तिकोना 

ढगाळ हवा. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या सरी. मधेच ढगाअडून डोकावणारा सूर्य. डोंगरकपारीतून वाहणारे वारे अशा सुखद वातावरणात हा ट्रेक झाला त्याबद्दल निसर्गाचे आभार मानत आम्ही तुंग किल्ल्याचा निरोप घेतला.

आमचा काफिला
(L to R  - मानसी, अमृता, अद्वैत, अभिजीत, प्रितेश, रेणुका, केतकी, गिरीशकाका, स्वप्नील, खाली सावलीत - मी)

गडावर पाण्याची सोय उपलब्ध नाही. खाण्या पिण्याची सोय आपण आपली करावी. तुंगवाडी मध्ये खाण्याची सोय होऊ शकते. गडाचा बहुतांश भाग कातळ आहे पावसाळ्यात तो भाग निसरडा होत असल्याने काळजी घ्यावी. बालेकिल्ल्याला जाणारी वाट अरुंद असल्याने आणि बालेकिल्ला आकाराने लहान असल्याने वरच्या लोकांना आधी खाली येऊ द्यावे आणि मग आपण वर जावे. 

कसे जावे
स्वतःचे वाहन असल्यास तुंगवाडीला २ मार्गांनी जाता येते. 
१. पुणे - पौड - हडशी - तिकोनापेठ फाटा - जवण - चावसर - मोर्वे - तुंगवाडी (चांदणीचौक मार्गे)
२. पुणे - कामशेत - काळे कॉलनी - तुंगवाडी (NH4 मार्गे)

जावण ते तुंगवाडी मार्ग 

स्वतःचे वाहन नसल्यास 
१. पुण्याहून लोकलने आल्यास लोणावळ्याला उतरावे. तिथून भांबुर्डे किंवा आंबवणे गावाकडे जाणाऱ्या बसने घुसळखांब फाट्यावर उतरावे. तिथून साधरण तास दीडतासात पायी तुंगवाडीत पोहोचता येते. 
२. पुण्याहून लोकलने कामशेतला उतरून कामशेत मोर्वे गाव या बसने तुंगवाडी फाट्यावर उतरावे तिथून साधारण तासभर पायपीट करून तुंगवाडीत पोहोचता येते. 
३. एकाच दिवसात तिकोना आणि तुंग पण करता येतात. तिकोना पेठेतून लॉंचने पलीकडच्या केवरे गावात येत येते. तिथून १५-२० मिनिटात आपण तुंगवाडीत पोहचू शकतो. 

***********************************************

एकूण खर्च 
पेट्रोल - १२० किमी करिता १० लिटर पेट्रोलसाठी - ८००/- (एका कार मध्ये ५ लोक)
नाश्ता - वडापाव (१०/-) चहा (१०/-)
जेवण - ऑर्डरप्रमाणे (पिरंगुट - मुळशी रस्त्यावर अनेक ढाबे आहेत.)
चांदणीचौक - पौडमार्गे आल्यास टोलनाका लागत नाही.
/*********************************************************************/
May your search through nature lead you to yourself.
Enjoy Travelling!!

Thank you

Comments

  1. seems grate treak ...
    simply awesome...

    ReplyDelete
  2. एक वेळ किल्ला चढणे किंवा सर करणे सोपे असेल पण ट्रेक वरून आल्यावर सविस्तर ब्लोग लिहिणे खरेच कठीण आहे त्या बाबतीत तू आणि प्रीतेश खरोखरीच महान आहत. फोटो आणि माहिती खूपच छान आहे. तुमच्या सर्वांच्या सहवासात घालवलेला हा दिवस कायम स्मरणात राहिल.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks a lot kaka.
      Pritesh has inspired me for blogging.
      And yes, the trek was fantastic yesterday.

      Delete
    2. I agree !! Kharach amazing varnan ..detailing..things to learn from you and Pritesh !!

      Delete
  3. Himanshu - apratim blog. Savistar sundar warnan. Tuzya mantla baher ala ch aahe pan tya barobar expenses ani killa yachi mahiti dileli awadli. Maz marathi likhan kas mage padat chalall aahe yachi navynae janiv zali.

    ReplyDelete

Post a Comment