हिरवाईने नटलेले - केरळ

“ऐन पावसाळ्यात लग्न करत आहात… सगळीकडे चिखल अन धो धो कोसळणारा पाऊस असणार… त्यात केरळचा मान्सून म्हणजे तर कहर… अशा वेळी कुठे जाताय केरळला… जवळपास कुठंतरी जा लोणावळा माथेरान असं...सोन्यासारखी पोरगी सोबत आहे, इतक्या लांब अशा पावसाचे तुम्ही एकटेच.. कुठे काही गडबड गोंधळ झाला तर… जरा पाऊस सरू दे मग जा… “

ह्या आणि अशा अनेक सुचनांकडे बिनदिक्कत दुर्लक्ष करीत मी केरळचा plan आखला. आमचे लग्नच पावसाळ्याचा कहर म्हणता येईल अशा जुलै महिन्यात झाले होते. लग्नाच्या तयारीपासूनच पाऊस हा constraint न राहता आमचा सहकारीच झाला होता. त्याच्याच सहवासात मग हा मधुचंद्र करायचे आम्ही ठरवले.

खरे तर केरळचा मान्सून हा मे च्या आसपास सुरु होतो आणि जुलै महिन्यापर्यंत संपतो असे हवामान खाते सांगते. पण आम्ही मात्र पावसाशी दोस्तीच केली होती, त्यामुळे पाऊस पडला काय किंवा पडला नाही काय, आम्ही जायचे नक्कीच केले होते.

सकाळी ११ वाजता विमानाने आम्ही पुण्याहून कोचीनला जाणार होतो. आई आणि सनत सोबत विमानतळावर सोडायला आले होते. हवामान ढगाळ होते पण तरी सकाळ छान वाटत होती. केतकीचा पहिलाच विमानप्रवास, त्यामुळे विमानतळापासूनच प्रत्येक अनुभव हा तिच्यासाठी नवीनच होता. आई आणि सनतचा निरोप घेऊन आम्ही विमानतळात प्रवेश केला. चेक-इन, सेक्युरिटी चेक इ. विधी आटोपून अंतिम टप्प्यातील प्रवासी प्रतीक्षागृहात येऊन आम्ही पोहोचलो. पुण्याचे विमानतळ तसे अगदीच सामान्य वाटले. अवघ्या जगातून जिथे लोक येतात अशा विद्येच्या आणि आता माहिती तंत्रज्ञानाच्या नगराचे प्रवेशद्वार फारच सुमार आहे असा विचार माझ्या मनात आला. काचेच्या एका मोठया दरवाज्याजवळ बाहेरची येणारी जाणारी विमाने बघत आम्ही आमच्या विमानाची वाट बघत बसलो. ११ वाजता आमचे विमान आले आणि ११.१५ वाजता full throttle वेग अनुभवत आम्ही भुतलचा निरोप घेतला आणि काही मिनिटातच वर निळेशार आकाश आणि खाली कापसाची दुलई अनुभवत कोचीनगरी मार्गस्थ झालो.

पुणे कोची हा साधारण तास दीड तासाचा प्रवास. १२.४० च्या आसपास आम्ही कोची विमानतळावर उतरलो. पुणे विमानतळाच्या मानाने कोचीचा विमानतळ चकाचक आहे. आंतरराष्ट्रीय असल्यामुळे असेल कदाचित.
विमानतळाबाहेरच आमची वाहक बिनुबाबांशी भेट झाली. कोची विमानतळ मुख्य शहरापासून साधारण ४० किमी दूर आहे.
हे केरळ मधील एक प्रमुख शहर. ह्याला संपन्न इतिहास. दक्षिण भारतातील एक महत्वाचे बंदर आणि व्यावसायिक केंद्र. आमचे परतीचे विमानही कोचिहून असल्यामुळे परतीच्या वेळेस कोचीनगरी फिरायचे आम्ही ठरवले. माडांच्या राईतून आणि चौफेर पसरलेल्या भातशेतातून वाट काढत कोचीनहून आम्ही मुन्नारला निघालो.

ऊन पावसाच्या पाठशिवाणीचा खेळ अनुभवत. प्रचंड अशा कातळातून कातरलेल्या वळणदार रस्त्याने आजुबाजूचा सुंदर निसर्ग अनुभवत संध्याकाळी 6 च्या आसपास आम्ही मुन्नारला पोहोचलो. थंडप्रदेशातून आलेल्या ब्रिटिश आणि इतर यूरोपीय वसाहतवाद्यांनी भारतात असताना देशाच्या उंच डोंगराळ भागात काही अप्रतीम गावे वसविली. मुन्नार हे त्यापैकी एक.
एका बाजूला डोंगररांग त्यात वसलेली छोटी छोटी घरं आणि दुसऱ्या बाजूस दूरवर पसरलेली चहाचे मळे. वाटेत थोड़ापुज्जा गावात एक धबधबा आहे.

केरळ सरकारने पर्यटनव्यवसायाकारिता अनेक योजना राबविल्या आहेत त्यामुळे मुन्नार मधे अनेक राहण्या खाण्याच्या उत्तम सोयी आहेत. सुट्यांच्या हंगामात केरळभ्रमंतीला प्रचंड मागणी असल्याने आधीच बुकिंग करून जावे लागते. आमच्या बाबतीत मात्र ऑफ सीजनचा आम्हाला फायदा झाला. फारशी गर्दी नव्हती त्यामुळे डायरेक्ट मुन्नारला पोहचून आम्ही हॉटेल शोधयचे ठरवले होते. बिनुबाबाच्या कृपेने मुन्नार टाउनच्या अलीकडेच आम्हाला राहण्याची सोय मिळाली. मुळचा सदशिवपेठी असल्यामुळे रूमच्या भाड्यासाठी थोडी हुज्जत घालून भाव खाली आणून आम्ही checkin केले. पाऊस सुरु होताच. आधीच डोंगरमाथा त्यात पावसाळी हवा असल्यामुळे मुन्नारमधे संध्याकाळी 6 च्या आसपसच अंधारून येते आणि आख्खे गाव धुक्यात गुरफटून जाते. इतके दाट धुके असते की समोरचे 10 फूट अंतरावरचेपण काही दिसत नाही.
ख़ास मधुचंद्रासाठी म्हणून त्या रिसोर्टच्या मालकने आम्हाला सर्वात वरच्या मजल्यावरची natureview स्पेशल खोली दिली. खिडकी उघडून बाहर पाहतोय तर पूर्ण धुके. कसला डोंबलाचा view म्हणत केतकीने खिडक़ी लावून घेतली.
हळूहळू पावसाचा जोर वाढत होता. मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर प्रचंड वाढला. इतका की भीती वाटावी. त्यात आमची सोय सर्वात वरच्या मजल्यावर, त्यामुळे पावसाचा आवाज, कर्णकर्कश भासणारा विजांचा आवाज आणि पावसाच्या थेंबांनी वरती कौलांवर चलावलेले तांडवनृत्य या सगळ्यामुळे आमच्या मधुचंद्राच्या पहिल्याच रात्रीला भयाण स्वरुप आले. सकाळी जाग आली तेव्हा पाऊस थांबला होता. सभोवतालची जाणीव व्हावी म्हणून सहज खिडकी उघडली आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आमचे रेसॉर्ट चहाच्या मळयाला लागूनच डोंगर उतारावर होते. त्याच डोंगरउतारावरुन आदल्यादिवशीच्या मुसळधार पावसामुळे एक भन्नाट धबधबा वाहत होता, आमच्या बाजूला आमच्याच् रेसॉर्ट सारखे एकच छोटे रेसॉर्ट होते आणि समोर अक्षरशः क्षितिजापर्यंत पोहोचलेले चहाचे हिरवेगार मळे!! 

दोन वेगळ्या प्रहरांत निसर्गाच्या ह्या दोन रूपांची अनुभूती आम्हाला मिळाली होती. नाश्ता आवारेस्तोवर बिनुबाबा एक धक्कादायक वार्ता घेऊन आला. 
आदल्या दिवशीच्या पावसाने त्या थोडापुज्जा धबधब्याजवळ दरड कोसळली होती. जवळपास 50 फूट उंच ढिग झाला होता. त्यामुळे कोची ते मुन्नार रस्ताच बंद झाला होता. कित्येक गाड्या दरीत फेकल्या गेल्या होत्या. आणि कहर म्हणजे पेरियार नदीला पूर आला होता. तिथल्या पोलिस अधिक्षकांशी बोलणे झाल्यावर आम्हाला समजले की गेल्या 45 वर्षात इतका मुसळधार पाऊस झाला नव्हता.
या पुरामुळे पेरियार भ्रमंतीवर आम्हाला पाणी सोडावे लागल आणि मुन्नार मधला आमचा मुक्काम वाढला.
हातून निसटलेल्या गोष्टींपेक्षा हाती असलेल्या गोष्टींचा विचार करायचे ठरवून आहे त्या क्षणांचे सोने करायचे आम्ही ठरवले आणि मुन्नारनगर भटकायला सुरुवात केली.

मुन्नारमधे खुप लवकर अंधारून त्यात पावसाळी हवेमुळे सर्वत्र धुके दाटते. एकतर सगळा डोंगराळ भागातून प्रवास रस्ते निसरडे आणि धुक्यात तर समोरचे 10 मिटरवरचे पण दिसायची सोय नाही. त्यामुळे एका दिवशी जास्तीत जास्त 2 ठिकाणे आम्हाला फिरता आली.

Rose Garden
मुन्नार मधे अनेक दुर्मिळ प्रजातींची फुले आढळतात. Rose Garden मधे त्यांचे प्रदर्शन मांडलेले आहे. त्यांबद्दल शास्त्रीय माहितीपण उपलब्ध आहे. केरळ फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे याची जबाबदारी आहे. आपल्या सोयीप्रमाणे जवळपासच्या डोंगररांगांत ट्रेक्स पण organise करून मिळतात.
Mattupetty Dam
मुन्नारपासून १३ किलोमीटर्सवर मट्टुपेट्टीगाव आहे. समुद्रसपाटीपासून साधारण १७०० मी.उंची. अन्नमुडि शिखराजवळ असलेले आणि चहुकडे हिरव्यागार वनाराईने वेढलेले हे गाव निसर्गवेड्यांना भुरळ पडतेच. इथे मट्टुपेट्टी धरणाचा विस्तीर्ण जलाशय आहे. जलशयाच्या भोवती असलेले जंगल अनेक प्रजातींच्या पक्ष्यांचा आसरा. ढगामागून अधून मधून डोकावणारा सूर्य, चहुकडे हिरवीगार वनाराई, त्याच वनाराईमुळे हिरवागार भासणारा जलाशय, निवांतपणा आणि केतकीचा सहवास असा मस्त योग जुळून आल्याने बराच वेळ आम्ही त्या काठावर बसून होतो. 


ढगाळ हवेमुळे दुपार झाल्याची जाणीव काही झाली नाही पण भुकेनी ती जाणीव करून दिली. अन् आम्ही परतीला लागलो आणि मुन्नार टाउन गाठले. मुन्नार गाव हे बऱ्यापैकी कमर्शियल झालेले आहे. हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि homestays चे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सोयी अनेक आहेत पण त्यामुळे निसर्गाच्या सहवासात राहायचा अनुभवमात्र मिळत नाही. खिड़की उघडली की शेजारच्या हॉटेलची खिडकी दिसते. त्यामुळे जास्त सोयी नसलेले पण गावाबाहेर निसर्गाच्या कुशीत राहण्याचा आमचा पर्याय किती योग्य होता याची आमची आम्हालाच जाणीव झाली.

Fun Forest
आमच्या हॉटेलच्या जवळच फन फॉरेस्ट नावाचा एक adventure activties चे यूनिट होते.
पेरियारच्या पुरामुळे तसापण आमचा मुक्काम वाढलेला होता त्यामुळे एक चक्कर ह्या camp ला द्यायचे आम्ही ठरवले.
गर्द झाडी, जवळून जाणारा धबधबा आणि पक्ष्यांचा किलबिलाट या सगळ्यात 3-4 तास वेगवेगळ्या so called adventurous activities करायला धमाल आली.
Burma Bridge
Horizontal Ladder
Spider Net
Tyre Walk
Zip Line 
अशा काही activities आम्ही केल्या.

Carmelgiri Elephant Park and Spice Plantation 
हत्ती हा केरळचा राष्ट्रीय प्राणी आहे. त्यामुळे हत्तीवरून एखादी सफ़र करणे क्रमप्राप्त होते. केरळ मधे पेरियारचे जंगल हे हत्तीसफारीसाठी प्रसिद्ध आहे. पण देवदुर्विलासाने आमचा पेरियार भेट हुकल्याने मुन्नार मधेच आम्ही हत्तीचा हट्ट पूर्ण केला. Carmelgiri Park मधे एक छोटी हत्ती सफारी आणि नंतर त्या गजराजाला प्रेमाचे चार घास भरवून आम्ही केरळच्या आणखी एका वैशिष्टयाकडे आमचा मोर्चा वळवला. केरळची हवा चहा प्रमाणेच अनेक मसाल्याच्या झाडांसाठी पोषक आहे. ख़ासकरून लवंग दालचीनी आणि जेष्ठमध हे पदार्थ इथले. Carmelgiri Park madhech केरळमधे होणाऱ्या मसाल्याच्या विविध वनस्पतींचे एक प्रदर्शन होते. तिथेच पिकणारे हे पदार्थ विक्रीसाठीपण ठेवले होते. आपल्या रोजच्या वापरात असलेल्या अनेक पदार्थांचे औषधी गुणधर्म तिकडे फिरता फिरता आम्हाला समजत गेले. कड़ीपत्ता हा भाजीमधील हानिकारक गोष्टी शोषून घेतो आणि स्वतःतील उपयुक्त गोष्टी त्या भाजीत देतो त्यामुळे जेवताना भाजीतील कड़ीपत्ता बाजूला काढावा हा साक्षात्कार आम्हाला तिकडे झाला.

Punarjani Ayurvedic Village
केरळ आणि आयुर्वेद यांचे एक अतूट नाते आहे. शेकडो वर्षांची आयुर्वेदातील साधनेची संपन्न परंपरा ह्या प्रांताला लाभलेली आहे. पुनर्जनी ही संस्था या आयुर्वेदीक थेरेपीसाठी प्रसिद्ध आहे. संध्याकाळी तिकडे जाऊन आयुर्वेदीक तेलाने मसाज करवून घेतले. जवळपास तासभर अंग रगडून घेतल्यानंतर एकेका सांध्याला त्याच्या जिवंतपणाची जाणीव झाली. 

Kathakali & Kalaripayattu
याच संस्थेमार्फत कथकली या नृत्यप्रकारचे आणि कलरयिपयट्टू ह्या साहसप्रकारचे खेळ चालतात.
ह्या दोन अविष्करांनी आम्हाला थक्क केले.
साधे पत्र्याची शेड असणारे थेटर. आत छोटेसे लाकडी स्टेज. स्टेजवर समोर नटराजाची मूर्ती आणि मूर्तिजवळ छोटासा दिवा. बाकी सगळा अंधार. एकेक कलाकार येऊन नटराजाला नमन करून स्टेज वर येतात. फ़क्त 2 दिव्यांनी स्टेज उजळलेले आहे. स्टेजवर फ़क्त 4 कलाकार. 2 वादक. एकाच्या हातात मृदंग आणि दुसऱ्याच्या हातात एकतारी सदृश एक वाद्य.
फ़क्त चेहऱ्यावरचे हावभाव आणि माफक हालचाली यातून श्रीकृष्ण-राधेचे प्रेम सादर करणाऱ्या त्या कलाकारांनी प्रेक्षकांना वेड लावले. 







कलरीपयट्टू हा प्राचीन भारतीय मार्शल आर्ट्सचा प्रकार. केरळ आणि तमिळनाडच्या काही भागात हा विशेष करून प्रचलित असलेला, प्रचंड चपळता, लवचिकता आणि प्रसंगावधान यावर आधारित हा साहसप्रकार. तलवार, लाठी, भाले. दाणपट्टा आदी हत्यारे वापरून चपळ हालचालींनी एकेकांशी दोन हात करणारे ते वीर अन समोर त्यांच्या चपळ पण लयबद्ध हालचाली चाप होऊन पाहणारे प्रेक्षक. 

३-४ दिवसांचा निसर्गाचा सुखद सहवास लाभल्यानंतर मुन्नारचा निरोप घेऊन आम्ही कुमारकोमला पोहोचलो. 
 कोट्टायम या शहरात वेम्बेनाड हा केरळमधील सर्वात मोठा जलाशय आहे. या जलाशयाच्या दोन बाजूस कुमारकोम आणि अल्लेप्पी अशी २ गावे backwater tourism साठी विकसित केलेली आहेत. इथे हाउसबोट मध्ये राहण्याचा अनुभव घेत येतो. अशाच एका हाउसबोट मध्ये आम्ही उतरलो. २ दिवस वेम्बेनाड तलाव आणि त्याच्या भोवती पसरलेल्या माडांच्या राईत निवांत गेले. 







कुमारकोमहून आम्ही कोचीला आलो. कोची शहरात फोर्ट कोची हा भाग पोर्तुगीज काळाची साक्ष देतो. इथे सेन्त.फ़्रन्सिस चर्च मध्ये वास्को-द-गामाचे थडगे आहे.



पोर्तुगीजांच्या माटेनचेरी  राजवाड्याचे  संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे. इथे केरळच्या हिंदू राजेरजवाड्यांचा इतिहास विविध म्युरल्स, तैलचित्रे आणि अनेक वस्तूंमधून जतन केलेला आहे. आता भारतीय पुरातत्व विभागाकडे याची जबाबदारी आहे.

संग्रहालयाजवळच एक सिनेगॉग आहे. परदेसी सिनेगॉग असे त्याचे नाव. हा सिनेगॉग सध्याच्या राष्ट्रकुल देशांतील सर्वात जुना सिनेगॉग मानला जातो. याची उभारणी १५६७ साली झाली. मलबारी यहुदी लोकांनी राजा रामवर्मा कडून जमीन घेऊन हा सिनेगॉग बांधला.



शेवटी कोचीच्या मार्केट मध्ये थोडीफार खरेदी केली. कोचीमध्ये साड्यांची आणि ड्रेस मटेरिअल्स ची अनेक दुकाने आहेत. सिमाट्टी सिल्क, कल्याण सिल्क, कल्याण ज्वेलर्स, जोयअलुक्कास ही स्त्रियांची तीर्थक्षेत्रे आहेत. 

९ दिवस फक्त एकमेकांचा सहवास आणि सोबत केरळभ्रमंतीतील अनेक सुंदर अनुभवांची शिदोरी घेऊन आम्ही कोचीहून पुण्याकडे प्रस्थान केले.

त्या आकाशातून खाली मागे सरणारी ती माडांची राई, ते पाण्याचे असंख्य ओहोळ, त्याच्या आसपासची ती उतरत्या छपरांची घरे, ती भातशेते, त्या डोंगररांगा अन् ते मल्याळी आगत्य आठवताना मनात विचार आला, जर काश्मीर हे भारतमातेच्या मस्तकी असलेला मुगुट असेल तर केरळ हे तिच्या चरणी असणारे रत्नजडीत पैंजण म्हणावे लागेल.
/***************************************************/
Itinerary
Total Duration - 8 days

  • Munnar - 4
  • Kumarkom - 1
  • Kochi - 3
Approx. Travel Expenses

  • Pune - Kochi - Pune journey by SpiceJet - Return Ticket for 2 persons - Rs.13500.
  • Car with a driver - Rs.1000 per day (includes food, stay of the driver and fuel cost)
Munnar
  • Venue - Munnar Hill View Resort near Punarjani Ayurvedic Village.
  • Accomodation - Rs.1000 per day (inclusive Breakfast.)
  • Food - Lunch/Dinner Rs. 100 per head per meal in a simple restaurant (Veg/Nov Veg).
  • Flower Garden Entry Fee - Rs.20 per head.
  • Carmel Garden - Rs. 550 per head.
  • Fun Forest fee - Rs. 400 per head.
  • Punarjani Ayurvedic Villege - Rs.1000 for Shirodhara Massage. Rs. 400 for Head Massage.
  • Punarjani Performing Arts - Rs.400 per head.
Kumarkom
  • Venue - Houseboat (Check in 10 AM Check out 9 AM)
  • Rs. 5000 including (2 rides in Wembenad Lake, All meals & stay in a A/C room for a couple)
  • There was a fish market on the other side of the lake where we bought fresh fish and the cook on the houseboat made us fish fry for the dinner.
  • Pomfret Fish pair - Rs.300
Kochi
  • Venue - Yuvarani Residency, M.G.Road
  • Accomodation - 2000 per day (inclusive breakfast)
  • Muttencherry Palace entry fee - Rs.10 for 2.
  • Food - Approx. 200 per head per meal.
/*********************************************************************/
May your search through nature lead you to yourself.
Enjoy Travelling!!

Thank you

Comments

  1. Mast lekh aami upyukta mahiti aahe.. me nehami bhajitala kadipatta khato.. pan aata ha lekh vachalyavar khanyacha talnar he nakki..

    ReplyDelete

Post a Comment